Students' in Fc college pledge for an eco-friendly Diwali : फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ! 

प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पुढाकार

Students' in Fc college pledge for an eco-friendly Diwali : फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ! 
पुणे:- पर्यावरणपूरक दिवाळीची शपथ घेताना फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ६ नोव्हेंबर २०२६ :- फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. प्रदुषणमुक्त पर्यावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत, ही शपथ घेतली आहे. 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ध्वनी व वायू प्रदूषणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने पर्यावरणपूरक दिवाळी जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना फटाक्यांचा वापर टाळून प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची सामूदायिक शपथ देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे मानवी आरोग्य, पशुपक्षी व पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी जपण्याचे आवाहन करण्यात आले.

उच्च न्यायालय आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण संचालकांच्या दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार हा जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात आला होता. हा उपक्रम उपप्राचार्या डॉ. प्रतिभा बिस्वास व पर्यवेक्षिका विनिता कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी, पर्यावरण शिक्षिका रूपाली सांगळे, डॉ. परमेश्वर जाधव, डॉ. रवींद्र पवार, जगदीश पाटील आदी उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन,प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण पूरक सण साजरे करण्याविषयी जागरूकता निर्माण झाली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांंमध्ये फटाके टाळू या, पर्यावरण जपू या'!, हा संदेश देण्यात आला.