Pune Zilla local self government  legislative council election: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड ; येत्या २२ जूनला होणार अधिकृत घोषणा!

पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक : प्रदीप कंद, श्रीकांत पाटील यांच्या माघारीमुळे काकडे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

Pune Zilla local self government  legislative council election: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड ; येत्या २२ जूनला होणार अधिकृत घोषणा!
पुणे:- विक्रम काकडे.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि.  जून २०२६ :- पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे हे उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी गुरुवारी (दि.४ जून) बिनविरोध झाले. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा ही येत्या २२ जून २०२६ रोजी केली जाणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांच्या माघारीमुळे विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उमेदवार वगळता भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह चार जणांनी उमेदवारी  अर्ज दाखल केले होते. कंद व पाटील यांच्या माघारीनंतर अन्य तीन अपक्ष उमेदवारांनीही आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला आहे. त्यामुळे काकडे हे बिनविरोध झाले असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे.

महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला सोडण्यात आलेली आहे. यानुसार महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीचा धर्म पाळत प्रदीप कंद यांनी गुरुवारी (दि. ४ जून) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीच्या मतदारांची संख्या खुपचं अल्प असल्याने श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस होता. या माघारीच्या दिवशी प्रदीप कंद, श्रीकांत पाटील यांच्यासह माजी आमदार सुनील टिंगरे, तुषार कामठे आणि सुनील जरे या पाच उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या पाच उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची घोषणा प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गजानन पाटील यांनी केली.