Groundwater level : चिंताजनक! पुणे जिल्ह्याच्या दारावर भीषण पाणी टंचाईचे संकट, जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळीत ०.८० मिटरने घट!
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सर्वाधिक २.२५ मीटरने भुजल पातळी खोल : मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा भयावह परिस्थिती
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २४ ऑक्टोबर २०२६ :- पुणे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाचा जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळीवर मोठा परिणाम झाला आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत यंदा पुणे जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी ही ०.८० मिटरने (२.६२ फूट) खोल गेली आहे. यामुळे संभाव्य भीषण पाणी टंचाईचे मोठे संकट हे पुणे जिल्ह्याच्या दारावर येऊन ठेपले असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंदापूर तालुक्यातील भूजल पातळीत जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच २.२५ मिटरने ( ७.३८ फूट) घट झाली आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने (GSDA) प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आतापासूनच विविध मार्गांनी पाणी बचतीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील अनेक भागात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. तसेच शेती व अन्य कारणांसाठी कूपनलिकांद्वारे (Borewells) पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला गेला असून शहरीकरणामुळे सिमेंटचे जाळे वाढल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाल्याने भूजल पातळीत कमालीची घट झाल्याचे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
केवळ पाऊस पडला, धरणे भरली किंवा नळाला पाणी आले म्हणजे पाण्याचे संकट टळले, असे गृहीत धरण्याची वेळ आता राहिलेली नाही. जमिनीच्या पोटात साठणारे पाणी म्हणजेच भूजल हा ग्रामीण भागासह शहरांच्या पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार मानला जातो. मात्र, पुणे जिल्ह्यातील सप्टेंबर २०२६ मधील भूजल पातळी ही मागील पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी २.३५ मीटरवरून ३.१५ मीटरपर्यंत खाली गेल्याची नोंद झाली असून सरासरी घट ०.८० मीटर इतकी आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणी नियोजनाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, भूजल पातळीतील ही घट म्हणजे केवळ आकडेवारीतील बदल नसून तिचा परिणाम विहिरी, कूपनलिका, शेती, पशुधन आणि ग्रामीण कुटुंबांच्या दैनंदिन जीवनावर होऊ शकणार आहे. पावसाचे प्रमाण, प्रत्यक्ष पडलेला पाऊस,जमिनीत मुरणारे पाणी, पाण्याचा उपसा आणि स्थानिक भूगर्भरचना या घटकांनुसार भुगर्भातील पाणी पातळी बदलत असते . त्यामुळे प्रत्येक तालुक्यात संकटाची तीव्रता सारखी नसली, तरी उपलब्ध आकडेवारी संभाव्य धोका ओळखून वेळीच उपाययोजना करण्याचा इशारा या आकडेवारीने पुणे जिल्ह्याला दिला आहे.
इंदापूरपाठोपाठ बारामती, दौंडमध्येही भूजल पातळीत मोठी घट
पुणे जिल्ह्यातील भूजल पातळीत झालेल्या घटीच्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार इंदापूर तालुक्यातील भूजल पातळीत सर्वाधिक २.२५ मीटरची घट झाली आहे. इंदापूरपाठोपाठ बारामती तालुक्यातील भूजल पातळीत १.७८ मीटर, दौंड तालुक्यातील भूजल पातळीत १.३० मीटर आणि हवेली तालुक्यातील भूजल पातळीत १.१८ मीटरने घट झाली आहे. पुरंदर तालुक्यातील भूजल पातळी ही ०.८३ मीटर, मुळशीमधील ०.६३ मीटर आणि जुन्नरमधील भूजल पातळी ही ०.६२ मीटरने खोल गेली आहे.
भूजल म्हणजे जमिनीखालील अदृश्य जलसाठा
भूजलाचे महत्त्व हे अनेकदा पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतरच लक्षात येते. विहिरी, कूपनलिका आणि अनेक स्थानिक जलस्रोतांना भूजलाचा आधार असतो. पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलसाठ्याची भरपाई करते. मात्र जमिनीवर काँक्रीटीकरण वाढणे,पावसाचे पाणी वाहून जाणे, पाणलोट क्षेत्रांची हानी आणि भूजलाचा पुनर्भरणापेक्षा अधिक वेगाने होणारा उपसा या विविध बाबींमुळे काही भागांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने भूजल पातळीत मोठी घट झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागातून सांगण्यात आले.
भूजलसाठा हा दिसत नसला, तरी त्याचा तुटवडा मात्र थेट जाणवत असतो. विहिरींची पाणीपातळी कमी होणे,पाणी मिळविण्यासाठी अधिक वेळ व खर्च लागणे आणि उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येणे, ही संभाव्य संकटाची लक्षणे आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचा विचार फक्त धरणांतील पाणीसाठ्यापुरता मर्यादित न ठेवता जमिनीखालील जलसाठ्याचाही विचार करणे आवश्यक आहे.
पाऊस पडतो, पण प्रत्येक थेंब जमिनीत मुरतो का?
पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलसाठा वाढण्यासाठी नैसर्गिक जलप्रवाह,ओढे,नाले,शेततळी, पाझर तलाव आणि पाणलोट क्षेत्रे यांचे महत्त्व मोठे आहे. मात्र, पावसाचे पाणी वेगाने वाहून गेले आणि जमिनीत मुरण्याची संधी मिळाली नाही, तर भूजल पुनर्भरण अपेक्षित प्रमाणात होऊ शकत नाही. त्याच वेळी विहिरी व कूपनलिकांमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसले जात असेल, तर पाण्याची पातळी खाली जाण्याचा धोका वाढत असतो.यासाठी केवळ नवीन विहिरी खोदणे किंवा अधिक खोल कूपनलिका घेणे, हा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. त्यासाठी पाणी कुठून येते, किती उपलब्ध आहे आणि किती वापरले जाते, याचे स्थानिक पातळीवर नियोजन करणे आवश्यक आहे.
दरम्यान, भूजल पातळीत झालेली घट कमी करण्यासाठी ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी गावनिहाय पाणी उपलब्धतेचा आढावा घेणे, विहिरींच्या पाणीपातळीचे नियमित निरीक्षण करणे, पावसाचे पाणी साठवणे व जमिनीत मुरवणे, जलसंधारणाची कामे योग्य ठिकाणी करणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी पिकांच्या पाण्याच्या गरजेनुसार नियोजन करणे, शक्य तेथे ठिबक व तुषार सिंचनाचा वापर वाढविणे आणि पाणी उपलब्धतेचा विचार करून पीकपद्धती ठरविणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकरची व्यवस्था करणे, ही तात्पुरती गरज असू शकते. पण पाणीटंचाई निर्माणच होऊ नये, यासाठी भूजलाचे पुनर्भरण आणि वापराचे नियोजन करणे हा दीर्घकालीन मार्ग आहे. जिल्ह्यातील भूजल पातळीतील या घटीच्या आकडेवारीने संभाव्य पाणी टंचाईच्या संकटाकडे दुर्लक्ष न करण्याचा इशारा दिला आहे. भूजलसाठा ही अमर्याद संपत्ती नाही. आजचा अनियंत्रित उपसा उद्याच्या पाणीटंचाईला आमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची गरज आहे.
पुणे जिल्ह्यातील भूजल पातळीतील तालुकानिहाय घट(मिटरमध्ये)
(टीप अनुक्रमांक, तालुका आणि भूजल पातळीतील घट या क्रमाने)
१) इंदापूर --- २.२५.
२) बारामती --- १.७८.
३) दौंड --- १.३०.
४) हवेली --- १.१८.
५) पुरंदर --- ०.८३.
६) जुन्नर --- ०.६२.
७) मुळशी --- ०.६३.
८) शिरूर --- ०.५०.
९) भोर --- ०.४१.
१०)खेड --- ०.४०.
११)आंबेगाव --- ०.२३.
१२) राजगड ( वेल्हे) ---०.१७.
१३) मावळ --- ०.१३.
पुणे जिल्ह्याची सरासरी घट --- ०.८०.
