Buddha's Philosophy, Maslow's Hierarchy of Needs, and the Path of the Gita : आधुनिक जीवनातील अस्वस्थतेचा शोध, अंधश्रद्धेवर उपाय : बुद्धांचे तत्त्वज्ञान, मॅसलोची गरजांची उतरंड आणि गीतेचा मार्ग!

Buddha's Philosophy, Maslow's Hierarchy of Needs, and the Path of the Gita : आधुनिक जीवनातील अस्वस्थतेचा शोध, अंधश्रद्धेवर उपाय : बुद्धांचे तत्त्वज्ञान, मॅसलोची गरजांची उतरंड आणि गीतेचा मार्ग!
डॉ. ललिता भगत.

आजच्या आधुनिक, वेगवान आणि स्पर्धात्मक युगात माणसाच्या जीवनात प्रगतीची अनेक साधने निर्माण झाली असली तरी मानसिक अस्वस्थता, तणाव, असुरक्षितता आणि समाधानाचा अभाव यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात. या पार्श्वभूमीवर गौतम बुद्ध यांनी मांडलेले दुःखाचे तत्त्वज्ञान, ॲब्रहम मॅसलो (Abraham Maslow) यांनी मांडलेली मानवी गरजांची उतरंड आणि भगवद्गगितेतील जीवनतत्त्वज्ञान यांचा एकत्रित विचार आज अधिकच महत्त्वाचा ठरतो, यावर प्रकाशझोत टाकणारा हा विशेष लेख. 

 डॉ. ललिता भगत

गौतम बुद्धांनी मानवी जीवनातील दुःखाचे स्वरूप व त्यामागील कारणे अत्यंत सूक्ष्मपणे समजावून सांगितली. त्यांनी सांगितलेल्या चार आर्यसत्यांनुसार जीवनात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, ते कारण दूर करता येते व त्यासाठी एक मार्ग आहे. या विचारांमध्ये त्यांनी “तृष्णा” किंवा “आसक्ती” हे दुःखाचे मूळ कारण असल्याचे स्पष्ट केले. आजच्या काळातही हे तत्त्वज्ञान तितकेच लागू पडते. आधुनिक जीवनात माणूस सतत अधिक मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. यात विशेषतः अधिक पैसा, अधिक प्रतिष्ठा,अधिक सुविधा यांचा अंतर्भाव असतो. पण या “अधिक” च्या मागे लागल्यामुळे त्याचे समाधान हरवत जाते आणि त्यातूनच मानसिक तणाव निर्माण होतो.

याच संदर्भात भगवद्गगितेतील एक महत्त्वाचा विचार लक्षात येतो. तो म्हणजे “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” म्हणजेच आपला अधिकार कर्मावर आहे, फळावर नाही. या तत्त्वज्ञानातून “आसक्तीविरहित कर्म” (Nishkama Karma) ही संकल्पना स्पष्ट होते. जेव्हा माणूस फळाच्या अपेक्षेने काम करतो, तेव्हा त्याच्यात चिंता आणि तणाव वाढतो. पण जेव्हा तो केवळ कर्तव्य म्हणून कर्म करतो, तेव्हा त्याला मानसिक शांती मिळते. हा विचार बुद्धांच्या “आसक्ती कमी करण्याच्या” तत्त्वाशी अत्यंत सुसंगत आहे.

दुसरीकडे, अब्राहम मॅसलो यांनी मानवी गरजांची एक उतरंड मांडली आहे. या उतरंडीनुसार माणसाच्या गरजा पाच स्तरांमध्ये विभागल्या जातात. यात शारीरिक गरजा, सुरक्षिततेच्या गरजा, प्रेम व आपलेपणाच्या गरजा, सन्मानाची गरज व आत्मसिद्धीची गरज यांचा अंतर्भाव होतो.या प्रत्येक स्तरावर माणूस स्वतःच्या आयुष्यात काहीतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, या गरजा पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत जेव्हा अपेक्षा आणि वास्तव यामध्ये तफावत निर्माण होते, तेव्हा माणूस अस्वस्थ होतो.

आजच्या समाजातील अनेक समस्या या मॅसलोच्या उतरंडीशी थेट जोडलेल्या दिसतात. उदाहरणार्थ, बेरोजगारी किंवा आर्थिक अस्थिरता ही “सुरक्षिततेच्या गरजा” पूर्ण न होण्याचे उदाहरण आहे. कुटुंबातील तणाव, एकटेपणा किंवा नातेसंबंधातील तुटलेपणा हे “प्रेम आणि आपलेपणा” या स्तरावरील अपूर्णतेचे द्योतक आहे. सोशल मीडियावर सतत स्वतःची तुलना करणे, लाईक्स आणि फॉलोअर्सच्या माध्यमातून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणे हे “सन्मान” या गरजेच्या अतिरेकाचे उदाहरण आहे.भगवद्गीतेत मनाच्या चंचलतेबद्दल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याबद्दलही सखोल मार्गदर्शन केले आहे. मन सतत इंद्रियांच्या मागे धावत राहते आणि त्यामुळे अस्थिरता निर्माण होते. गीतेनुसार “संयम” आणि “स्वअनुशासन” यांच्या मदतीने मनावर नियंत्रण मिळवता येते. हा विचार आजच्या “माइंडफुलनेस” या संकल्पनेशी जवळचा आहे, ज्याचे मूळ बुद्धांच्या ध्यान आणि जागरूकतेच्या तत्त्वज्ञानात आहे.

या तिन्ही विचारसरणी एकत्र पाहिल्यास एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे मॅसलो आपल्याला “गरजा” समजावून सांगतो, बुद्ध त्या गरजांमधील “आसक्ती” कमी करण्याचा मार्ग दाखवतात, आणि भगवद्गगिता आपल्याला “कर्तव्य करताना समत्व आणि संतुलन” कसे ठेवावे हे शिकवते. म्हणजेच, गरजा असणे नैसर्गिक आहे, पण त्यांच्याशी अतिरेकी जोडले जाणे हे दुःखाचे कारण ठरते.

आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने माणसाचे जीवन सुलभ केले आहे. तरीही मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. यामागे एक मोठे कारण म्हणजे माणसाने स्वतःच्या अपेक्षा आणि मर्यादा यांचा योग्य विचार न करणे. जेव्हा गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर जातात, तेव्हा माणूस असहाय्य होतो आणि त्यावेळी तो चमत्कार, अंधश्रद्धा किंवा अवैज्ञानिक उपायांकडे वळतो.

अंधश्रद्धा ही माणसाच्या भीतीतून आणि असुरक्षिततेतून निर्माण होते. जेव्हा एखादी समस्या आपल्या कुवतीच्या पलीकडे जाते. उदा. गंभीर आजार, आर्थिक संकट, नातेसंबंधातील ताण, तेव्हा माणूस तर्क सोडून “काहीतरी चमत्कार होईल” या आशेवर अवलंबून राहतो. यामुळे काही वेळा त्याची दिशाभूल होते आणि तो चुकीचे निर्णय घेतो.

परंतु जर आपण थोडा तार्किक आणि चिकित्सक विचार केला, तर अनेक समस्यांचे उत्तर आपल्यालाच सापडू शकते. बुद्धांनी सांगितलेला “मध्यम मार्ग” आणि भगवद्गीतेतील “समत्व योग” या दोन्ही संकल्पना याचाच आधार आहेत. अतिविचार किंवा अतिरेक टाळून संतुलित जीवन जगणे, हे या तत्त्वज्ञानांचे मुख्य सार आहे.

आजच्या काळात “माइंडफुलनेस” (जाणीवपूर्वक जगणे) ही संकल्पना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. वर्तमान क्षणात राहणे, आपल्या विचारांचे निरीक्षण करणे, आणि अनावश्यक ताण टाळणे. या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हे तत्त्वज्ञान बुद्धांच्या ध्यानपद्धतीत आणि गीतेतील ध्यानयोगात स्पष्टपणे दिसून येते. तसेच, मॅसलोच्या उतरंडीचा विचार करून आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो. माझ्या कोणत्या गरजा अपूर्ण आहेत? मी त्या पूर्ण करण्यासाठी योग्य मार्ग निवडत आहे का? माझ्या अपेक्षा वास्तववादी आहेत का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधल्यास आपल्याला स्वतःच्या समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग सापडू शकतो.

आजच्या शिक्षण पद्धतीतही या तिन्ही विचारसरणींचा समावेश होणे गरजेचे आहे. केवळ माहिती आणि कौशल्ये देणे पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांना जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून सांगणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन आणि तार्किक विचारसरणी यांचा विकास केल्याशिवाय खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकत नाही.

याचप्रमाणे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर लोकांच्या विचारसरणीत बदल होणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण, संवाद आणि जागरूकता या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

एकूणच पाहता, आजच्या आधुनिक युगात मानवी जीवन अधिक सोयीस्कर झाले असले तरी मानसिक शांती मिळवणे अधिक कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आपल्याला अंतर्मुख होण्याचा मार्ग दाखवते, मॅसलोची गरजांची उतरंड आपल्याला स्वतःच्या जीवनातील प्राधान्यक्रम समजून घेण्यास मदत करते, आणि भगवद्गीता आपल्याला कर्तव्य, समत्व आणि संयम यांचा मार्ग दाखवते.

शेवटी असे म्हणता येईल की, आपल्या अनेक समस्या बाह्य परिस्थितीत नसून आपल्या विचारांमध्ये, अपेक्षांमध्ये आणि दृष्टिकोनात दडलेल्या असतात. जर आपण बुद्धांनी सांगितलेला समतोल, मॅसलोने सांगितलेली गरजांची जाणीव आणि गीतेने दिलेला कर्तव्ययोग यांचा योग्य समन्वय साधला, तर आपल्याला केवळ समस्या सोडवता येतील असे नाही, तर एक अधिक समाधानी, शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगता येईल.